Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
पश्चिम महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांचे नेतृत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे?
Aapli Baatmi October 05, 2020

पंढरपूर (सोलापूर) : राज्यातील साखर कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम अगदी तोंडावर आलेला असतानाच, राज्यभरातील ऊसतोड कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी साखर कारखान्यांच्या विरोधात कोयता बंद आंदोलन पुकारले आहे. मराठवाडा व विदर्भात माजी मंत्री पंकजा मुंडे, आमदार सुरेश धस यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. त्यानंतर या आंदोलनाचे लोण पश्चिम महाराष्ट्रात धडकले आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी स्वतः पुढाकार घेत ऊसतोड कामगारांच्या विविध प्रश्नांवर रान उठवले आहे.
विशेष म्हणजे, पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदाच ऊस तोडणी मजूर आणि मुकादमांनी आमदार पडळकरांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत ऊस तोडणी कामगार आणि मुकादमांच्या तोडणी दरात वाढ केली जाणार नाही, तोपर्यंत हातात कोयता घेतला जाणार नाही, असा इशारा दिला आहे. भाजप नेत्यांनी ऊसतोड कामगार प्रश्नी पुकारलेल्या ऊसतोड बंद आंदोलनामुळे साखर कारखानदार अस्वस्थ झाले आहेत.
मागील पाच वर्षांपासून ऊस तोडणी मजुरीत वाढ झाली नाही. जुन्याच दराने ऊस तोडणी कामगारांकडून काम करून घेतले जाते. कष्टाची कामे करूनही ऊसतोड कामगारांना सरकारकडून कोणतेही संरक्षण दिले जात नाही. साखर कारखान्यांच्या परिसरात शौचालये नसल्याने महिला मजुरांची कुचंबणा होते. मुकादमांनाही साखर कारखान्यांकडून कोणतेही संरक्षण मिळत नसल्याने ऊस तोडणी आणि वाहतूक व्यवसाय धोक्यात आला आहे.
सरकारने ऊस तोडणी दरात वाढ करावी, मुकादमांचे कमिशन वाढवून द्यावे, महिलांसाठी शौचालयाची सोय करावी यासह इतर प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले आहे. मराठवाडा, विदर्भात यापूर्वीच आंदोलन सुरू झाले आहे. त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांनी आंदोलन पुकारले आहे.
आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भागातील ऊसतोड मजुरांनी मेळावे घेत एकजूट केली आहे. मंगळवेढा येथे रविवारी (ता. 4) ऊस तोडणी कामगार आणि मुकादमांचा मेळावा झाला. यामध्ये अनेक ऊस तोडणी मजूर आणि मुकादम सहभागी झाले होते.
राज्य सरकारने ऊस तोडणी मजुरांचे शोषण केले आहे. ज्यांच्या जिवावर साखर उद्योग सुरू आहे, तोच कामगार हा घटक उपेक्षित आहे. सरकार आणि साखर कारखानदारांनी ऊस तोडणी मजुरांचे प्रश्न तातडीने सोडवावेत, अशी मागणी करत आमदार पडळकरांनी मजुरी दरात वाढ करावी; अन्यथा कोणत्याही परिस्थितीत साखर कारखान्यांचे धुराडे पेटू देणार नाही, असा इशारा दिला आहे.
आमदार पडळकरांनी प्रथमच पश्चिम महाराष्ट्रातील ऊसतोड मजुरांच्या या आंदोलनाचे नेतृत्व हाती घेतले आहे. मागील पंधरा दिवसांपासून आमदार पडळकर गावोगावी जाऊन ऊसतोड मजुरांचे मेळावे घेऊन मजुरांना आस्वस्थ करत आहेत. त्यांच्या मेळाव्यांना ऊसतोड मजूर आणि मुकादमांचाही मोठा पाठिंबा मिळत आहे.
राज्यातील बहुतांश साखर कारखाने राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस नेते आमदारांचे आहेत. येत्या काळात ऊस तोडणी कामगारांच्या आंदोलनावरून भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आमने-सामने येण्याची शक्यता आहे. भाजप नेत्यांनीही आमदार पडळकरांना पश्चिम महाष्ट्रातील ऊसतोड मजूर कामगारांचे नेतृत्व करण्याची संधी देऊन त्यांच्यावरील विश्वास अधिक दृढ केला आहे.
संपादन : श्रीनिवास दुध्याल
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023