Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
जो बत्ती करतो गुल, तो नेता 'पावरफुल्ल'!
Aapli Baatmi October 18, 2020

सातारा : विधानसभा व सातारा लोकसभेची पोटनिवडणूक गेल्यावर्षी एकत्र झाली. यावेळी साताऱ्यातील जिल्हा परिषदेच्या मैदानावर राष्ट्रवादी कॉंग्रेसची भरपावसात सांगता सभा झाली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुसळधार पावसात भाषण करून सातारकरांना साद घातली. मी मागील वेळी केलेली चूक यावेळी सातारच्या जनतेने दुरूस्त करावी, अशी विनंती केली. पवारांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत सातारकरांनी राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांना विजयी केले. भाजपकडून लढणाऱ्या उदयनराजे भोसले यांचा पराभव झाला. पवारांची भरपावसातील ही सभा त्यावेळी देशभरात प्रचंड गाजली. सातारा पोटनिवडणूकच नव्हे, तर विधानसभेच्या निवडणुकीचाही ट्रेंड या सभेने बदलून टाकला, असेही मानले जाते. या सभेच्या वर्षपूर्तीनिमित्त आज (रविवारी ता. 18) राष्ट्रवादीकडून सातारा शहरात फ्लेक्स उभारून या आठवणींना उजाळा दिला जाणार आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीची दिग्गज मंडळी भाजपच्या वाटेवर गेली. साताऱ्यात राष्ट्रवादीला खिंडार पडले. चार महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून सातारा लोकसभा निवडणूक लढून विजयी झालेले उदयनराजे भोसले यांनी विधानसभेच्या तोंडावर पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. आता राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला कोण वाचविणार?, असा प्रश्न उपस्थित झाला. अशावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार या 79 वर्षाच्या योद्ध्याने संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र पिंजून काढला. अजून मी म्हातारा झालेलो नाही, असे म्हणत पायाला भिंगरी लावून प्रचारात आघाडी घेतली. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या दिग्गज नेत्यांची फौज आणि दुसरीकडे राष्ट्रवादीकडून केवळ एकच शरद पवार असा प्रचाराचा धुरळा राज्यभरात उडाला. यामध्ये कलाटणी देणारी ठरली ती साताऱ्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसची धो धो पावसातील खासदार शरद पवार यांची सांगता सभा.
Vidhan Sabha 2019 : धो धो पावसात भिजत शरद पवारांचे साताऱ्यात घणाघाती भाषण (व्हिडिओ)
साताऱ्यात जिल्हा परिषदेच्या मैदानावर झालेल्या या सभेकडे समस्त सातारकरांचे लक्ष लागले होते. या सभेपूर्वी साताऱ्यात मोदी, शहा यांच्या सभा झालेल्या होत्या. पवार यांच्या सांगता सभेसाठी हजारो सातारकर जिल्हा परिषदेच्या मैदानावर भर पावसात थांबून होते. पाऊस इतका वाढला, की आता सभा होणार की नाही, अशी शंका उपस्थितांच्या मनात चुकचूकली. पण, श्री. पवार भर पावसातच उघड्या व्यासपीठावर आले आणि त्यांनी भाषणाला सुरवात केली. उपस्थित हजारो लोकांनी घोषणांनी आसमंत दुमदुमून टाकला. कोण आला रे कोण आला… राष्ट्रवादीचा वाघ आला… अशा घोषणा देत समस्त सातारकरांनी दाद दिली. अंगरक्षकाने आणलेली छत्रीही पवार यांनी नाकारली. माझी जनता भिजत उभी असताना मी छत्री घेऊन कसा उभा राहू, असे म्हणून त्यांनी पावसात भिजत जोशपूर्ण भाषण केले अन् उपस्थितांत उत्साह संचारला. श्री. पवार यांचे भाषण संपेपर्यंत प्रेक्षकांतील एकाही व्यक्तीने जागा सोडली नाही.
साताऱ्यातील सभेत भिजूनही पवार हे नाहीत विसरले
मागील वेळी माझ्याकडून एक चूक झाली आहे. ही चूक या निवडणुकीत सातारकरांनी दुरूस्त करावी, असे आवाहन केले. त्यांचा रोख उदयनराजे यांना उमेदवारी देण्यावर होता. पुढे या निवडणुकीत भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांचा पराभव झाला. श्रीनिवास पाटील राष्ट्रवादीतून साताऱ्याचे खासदार झाले, हे सर्वश्रुत आहेच. आज (रविवारी) या सभेला एक वर्ष पूर्ण होत आहे. या सभेच्या आठवणी प्रत्येक सातारकरांच्या मनात आजही घर करून राहिलेल्या आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तर आपल्या घरात शरद पवारांचा पावसातील भाषण करतानाचा फोटो लावला आहे. या सभेच्या वर्षपूर्तीनिमित्त पक्षाकडून संपूर्ण साताऱ्यात फ्लेक्स लावून आठवणींना उजाळा देण्याचे काम केले जात आहे.
कोण आला रे कोण आला, मोदी-शहांचा बाप आला; साताऱ्यात शक्तीप्रदर्शन
जोश पूर्ण भाषण अन् उपस्थितांत उत्साह संचारला
पाटणच्या सभेनंतर साताऱ्यातील सांगता सभा होणार होती. पाटणमध्ये सभा सुरू असतानाच पाऊस सुरू होता. त्यामुळे साताऱ्यातील सभा होणार का, अशी शंका शरद पवारांच्या मनात होती. त्यांनी मला पुढे जाऊन सभेसाठी उपस्थित जनसमुदायास करण्यास सांगितले, असे सांगून आमदार शशिकांत शिंदे म्हणाले, मी सभेच्या ठिकाणी पोहोचलो भाषण सुरू करून उपस्थितांत ऊर्जा निर्माण केली. तोपर्यंत पवारसाहेब सभेच्या ठिकाणी पोहोचले. पवारसाहेब आल्या आल्या भाषणास उभे राहिले अन् पाऊस सुरू झाला. त्यावेळी त्यांच्या अंगरक्षकाने आणलेली छत्रीही नाकारली. माझी जनता भिजत उभी असताना मी छत्री घेऊन कसा उभा राहू, असे म्हणून त्यांनी धो पावसात भिजत जोश पूर्ण भाषण केले अन् उपस्थितांत उत्साह संचारला. पवारसाहेबांचे भाषण संपले अन् पाऊस गेला. पण, साताऱ्यातील त्या ऐतिहासिक सभेने पुढे परिवर्तनच घडविले.
संपादन : बाळकृष्ण मधाळे
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023